Monday, 19 March 2018

राजची शिमग्याची गुढी !

राज साहेबांचं भाषण मी TV वर पाहिलं. तेंव्हा बाळ नांदगावकर बोलत होते. बाळ नांदगावकर यांचे शब्द ऐकू येण्याऐवजी त्यांच्या तोंडून येणारा शिट्टी सारखा हवेचा आवाजच जास्त ऐकू येत होता. त्यांच्या तोंडी माईक देऊन मनसे ची जी घसरण सुरु झाली ती शेवट पर्यंत कायम राहिली.
'मनसे संपली असं म्हणणार्यांनी त्यांनी हि गर्दी बघावी' अशी सुरवात करणाऱ्या राज ठाकरेंनी "माझ्या भाषणाला गर्दी होते पण मतदान होत नाही" अशी लाडिक तक्रार मागे केली होती. गर्दी झाली म्हणजे मनसे अजून टिकून आहे अशी स्वतःची समजूत राज यांनी तरी करून घेऊ नये. बाकी तडकाफडकी मेळावे आयोजित करून मैदान भर गर्दी केली हे राज यांचं वैयक्तिक यश आहे मनसेचे नव्हे.
श्रीदेवी यांच्या मृत्यूबद्दल बोलताना राज म्हणाले "काही लोक असं म्हणाले कि पदम पुरस्कार विजेत्याचा मृतदेह राष्ट्रध्वजा मध्ये गुंडाळण्यात येतो. झूट " "झूट?" अर्रे काय हि भाषा? सदानकदा मराठी-मराठी करणार्यांनी 'खोटे' हा मराठी किंवा 'असत्य' संस्कृत शब्द नवापरता झूट असा अशुद्ध पर्शियन शब्द वापरावा? मूळ पर्शियन शब्द झूठ असा आहे .
राज यांनी विश्वदीपक नामक झी न्यूझ या वाहिनीच्या कर्मचाऱ्याने आज नोकरी सोडली असा उल्लेख केला. हे प्रकरण आजचे (म्हणजे मार्च २०१८) सालचे नसून २०१६ सालातील आहे. आणि राज ठाकरे थापा मारतायत कि "त्याने आज राजीनामा दिलाय"
राज यांनी साम TV चाही उल्लेख केला. कि साम वरून एका पत्रकाराला काढून टाकण्यात आलं. पण साम TV कोणाच्या बापाच्या मालकीचा आहे याचा उल्लेख त्यांनी मुद्दाम केला नाही. साम TV हा सकाळ वृत्तसमूहाच्या मालकीचा असून त्याची मालकी सुप्रिया सुळे यांच्या तीर्थरूपांकडे म्हणजेच शरद पवार यांच्या कडे आहे. त्यामुळे साम वरून पत्रकाराला काढून टाकण्याच्या घटनेचा उल्लेख राज यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची मुलाखत घेतली तेंव्हा केला असता तर त्यांना ताबडतोप उत्तर मिळालं असतं. पण राज म्हणतात त्याप्रमाणे देशात एक प्रकारची आणीबाणी असल्यामुळे मोदींच्या गुरूच्या जिल्ह्यात जाऊन त्यांना असले प्रश्न विचारण्याचं धाडस अंगाशी आलं असतं. म्हणून आपल्या मर्जीतल्या जनतेसमोर त्यांनी साम आणि (२ वर्ष जुन्या) झी न्यूझ प्रकरणाचा उल्लेख केला.
बाकी रत्नागिरीला खोटं कर्ज दिल्याचं प्रकरण राज यांनी पुन्हा उगाळलं. तसंच आम्हाला Bullet ट्रेन नको, मेट्रो हि नको आणि समृद्धी महामार्ग हि नको हे स्पष्ट केलं. आपला मतदार हा पुण्या-मुंबई चा असल्यामुळे करोडो रुपये खर्चून होणाऱ्या Hyperloop विषयी राज यांनी चाकर शब्द काढला नाही. त्या विषयी राज यांनी बाळगलेलं मौन हे कानठळ्या बसवणारं होत. 
बाकी गुढी पडावा मेळावा घेण्याऐवजी मनसे ने होळीचा मेळावा घेतला असता तर तो जास्त संयुक्तिक ठरला असता. गुढीपाडव्याला शिमगा करणे हि मराठी संस्कृती नाही. पण राज च्या गळ्यात घंटा कोण बांधणार? आपण जो शिमगा करतोय तो लोकांना आवडत नाहीये हे लक्ष्यात आल्या वर राज ने राम मंदिराला न-मागता बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला. त्याला लोकांचा तुफान प्रतिसाद लाभला. संपूर्ण भाषणात सर्वात जास्त टाळ्या घेणारं हे वाक्य भाजपच्या जाहीरनाम्यातील होतं याचा राज यांनीही बारकाईने विचार करावा. पण त्याला कारणं हि तसच होतं.
लोकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला राज यांचा नकलांचा Piece त्यांच्या भाषणात येत नव्हता. या मागे एक थेअरी अशी आहे कि राज यांच्यावर नकला न-करण्यासाठी दिल्ली वरून दबाव होता. राज यांनी संपूर्ण भाषणात नक्कल टाळणं म्हणजे बाळासाहेब यांनी आपल्या भाषणात शिवी टाळणं किंवा शरद पवार यांनी जातीयवाद टाळण्या सारखंच अनाकलनीय आहे. पण दुसरी थेअरी अशी हि आहे कि राज स्वतःचीच नक्कल करण्यात रममाण झाले आहेत. भाषण्याच्याशेवटी "मी जोतिषी नाही. माझे काही ठोकताळे आहेत. मी मागे हे सांगतलं मी मागे ते सांगतलं" असं करून राज यांनी स्वतःचीच नक्कल करण्याच्या प्रयत्न केला. पण तो काही तेवढा जमला असं वाटत नाही.
राज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मेहनतीचं आवाहन केलंच आहे. तरी राज आणि त्यांच्या बरोबर असलेल्या एकमेव नगरसेवकाला राजकीय दमछाकीसाठी खूप खूप शुभेच्छा!

No comments: